Laxmikant Berde: तुम्हाला नायिकेबद्दल कधी आकर्षण वाटलं होतं का? मराठी सिनेसृष्टीतील रोमँटिक सीनबाबत लक्ष्मीकांत बेर्डेंनी दिलेलं भन्नाट उत्तर
मराठी सिनेसृष्टी ही उत्कृष्ट कलाकारांची खाण आहे. या कलाकारांपैकी एक म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. ते आज या जगात नसले तरी त्यांचे अजरामर चित्रपट आणि काही खास आठवणी आजही चाहत्यांना खूप आवडतात.

मराठी सिनेसृष्टी ही अप्रतिम कलाकार, उत्कृष्ट अभिनयाची खाण आहे. आजच नाही तर गेल्या अनेक दशकांपासून मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या अभिनयाचं भरभरून कौतुक करण्यात आलं आहे. अशोक सराफ, निळू फुले, स्मिता पाटील, लक्ष्मीकांत बेर्डे अशी अनेक नावं आहेत जी मराठी सिनेसृष्टीला कलाटणी देणारी म्हणजेच चित्रपटसृष्टीतील टर्निंग पॉइंट ठरली.
महत्त्वाचं म्हणजे कलाकारांच्या अभिनयाइतकंच त्यांचं खासगी आयुष्य जाणून घेण्याची चाहत्यांची इच्छा असते. अशात जर लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणी ताज्या झाल्या तर मराठी प्रेक्षकांच्या आणि रसिकांच्या डोळ्यांचा कोपरा हळूच भिजतो.
सध्या सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये अभिनेता शेखर सुमन यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंशी संवाद साधला आहे. शेखर यांच्या टॉक शोमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी खास त्यांच्या खास अंदाजामध्ये दिलखुलास संवाद साधला आहे.
या रंजक मुलाखतीमध्ये शेखर यांनी लक्ष्मीकांत यांना विचारले की, बऱ्याचदा असं होतं की सिनेमाचा नायक नायिकेच्या प्रेमात पडतो. तुम्हालाही असा अनुभव आला आहे का? त्यावेळी 'लक्ष्या' यांनी दिलेल्या उत्तरामुळे एकच हशा पिकतो. ते म्हणतात की, मराठीत तर अशा गोष्टी होतच नाहीत. प्रेम होत नाही, थेट लग्न होतं.
इतकेच नाही तर पुढे ते म्हणतात, मराठी चित्रपटांमध्ये कसं सगळं दुरूनच... यावर सगळेच मनसोक्त हसतात. पुढे शेखर यांनी असेही विचारले होते की तुम्हाला कधी तुमच्या एखाद्या खास नायिकेबद्दल आकर्षण वाटले आहे का? यावर त्यांनी उत्तर दिले की, 'आकर्षण तर कशाविषयीही असू शकते. मात्र जे आपल्याला मिळणारच नाहीये किंवा आपलं नाहीच, त्याकडे पाहायचे तरी कशाला?'