
कल्याणच्या जुन्या आग्रा रोडवरील एका कपड्याच्या दुकानात खळबळजनक प्रकार घडला आहे. 30 हजार रुपये किंमतीचा लेहंगा परत न घेतल्याच्या कारणावरून संतप्त ग्राहकाने दुकानात येऊन थेट सुरी काढली आणि तो लेहंगा फाडून टाकत दुकानदाराला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणच्या जुन्या आग्रा रोडवरील 'कलाक्षेत्र लालचौकी डेपो' हाउसिंग सोसायटीतील एका नामांकित कपड्याच्या दुकानात 17 जुलै रोजी ग्राहक आणि दुकानदार यांच्यात वाद निर्माण झाला. मेघना माखीजा या महिलेने 30 हजार रुपये किमतीचा लेहंगा खरेदी केला होता. मात्र नंतर काही कारणास्तव तिने पैसे परत मागितले. दुकानदाराने वस्तू परत न घेता कस्टमर क्रेडिट नोट देण्यास सांगितले.

त्यामुळे संतप्त झालेली मेघना माखीजा आणि तिचा होणारा नवरा सुमित सयानी यांनी 19 जुलै रोजी दुकानात जाऊन गोंधळ घातला. एवढंच नाही तर सुमित सयानी याने थेट खिशातून सुरी काढून तो लेहंगा सर्वांसमोर फाडला. तसेच दुकानदाराला धमकी दिली की, "हा लेहंगा जसा फाडला, तसंच तुझं आयुष्यही फाडून टाकेन...!"

याशिवाय सुमित सयानी याने "गुगल रिव्ह्यूवर निगेटिव्ह पोस्ट करून तुमचं दुकान बंद पाडीन" अशी धमकीही दिली. या घटनेमुळे दुकानदार प्रवीण समातानी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. बाजारपेठ पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत सुनीत सयानी विरोधात भा.दं.वि. कलम 352, 324(5), 351(3), 425 तसेच मुंबई पोलीस अधिनियमाचे कलम 37(1), 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.