
बदलापूरमधील एका तरुण चित्रकारानं सध्या जागतिक स्तरावर भारताचं नाव उंचावलं आहे. प्रतीक प्रधान असं या वन्यजीव छायाचित्रकाराचं नाव असून त्याला इटली आणि रशियामधील नामांकित स्पर्धांमध्ये पारितोषिकं मिळाली आहेत.

ही पारितोषिकं मिळवणारा प्रतीक हा पहिला भारतीय ठरला आहे. बदलापूरला राहणाऱ्या प्रतीक प्रधान याला लहानपणापासूनच वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड होती.

मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून प्रतीकने फोटोग्राफीचं प्रशिक्षण घेतलं. यानंतर तोही स्वतंत्रपणे वाईल्डलाईफ फोटोग्राफी करु लागला.

देशाबाहेर किंवा फारसं लांब न जाता त्याने ठाणे जिल्ह्याला लाभलेल्या निसर्गाची निवड केली. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ ग्रामीण, मुरबाड तसंच माथेरान या परिसरात फिरून त्याने अनेक चांगली छायाचित्रं आपल्या कॅमेरात टिपली.

काही महिन्यांपूर्वी प्रतिकने मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ सीगल पक्षांच्या थव्याचं एक अतिशय सुंदर छायाचित्र टिपलं होतं. हे छायाचित्र त्यानं इटलीच्या अॅस्पेरिका आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत पाठवलं. या स्पर्धेत प्रतीकला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि 750 युरो असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

त्यानंतर प्रतिकने माथेरानच्या जंगलात भक्ष्याच्या प्रतिक्षेत असलेला सापाचा काढलेला फोटो रशियातील गोल्डन टर्टल फेस्टिव्हल या फोटोग्राफीच्या स्पर्धेत पाठवला होता. या छायाचित्राला त्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिकं मिळाल्यानंतर प्रतीकवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रतीकने याआधी आशिया खंडातील 'सँक्च्युअरी एशिया' या स्पर्धेतही पहिला क्रमांक पटकावला होता.

वन्यजीव छायाचित्र काढणं हे आव्हानात्मक तर आहेच, मात्र यासाठी सहनशक्तीची कसोटी लागत असल्याचं प्रतीक सांगतो.

अजूनही प्रतीक रात्री बेरात्री तासनतास जंगलाचे फिरत असतो. त्यामुळेच त्याला आज हे मोठं यश मिळालं असून त्याचं बदलापूरमध्ये कौतुक होत आहे.