
मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात ते अधिक महत्वाचे आहे. उन्हामुळे आणि उष्णतेमुळे मधुमेही रुग्णांना जास्त थकवा जाणवतो, डिहायड्रेशनची समस्या असते, या काळात उष्णता लागण्याचा धोकाही त्यांना अधिक असतो. मधुमेहाच्या रूग्णांनी रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी काही खास पेयांचा आहारामध्ये समावेश करणे आवश्यक आहे.

कारल्याच्या रसात व्हिटॅमिन ए, थायमिन आणि रिबोफ्लेविन मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत होते. उन्हाळ्यात तुम्ही कारल्याचा रस सेवन करू शकता. विशेष म्हणजे कारण्याचा रस पिल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

दुधी भोपळ्याचा रस पिणे मधुमेहाचा रूग्णांसाठी फायदेशीर ठरते. त्यात सुमारे 90 टक्के पाणी असते. यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप चांगले आहे. दुधी भोपळ्याचा रस शरीर थंड ठेवण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

गिलोयचा रस मधुमेहाच्या रूग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, ते साखर नियंत्रित करण्यास मदत करते, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. यामुळे या हंगामात गिलोयच्या रसाचा आहारात नक्कीच समावेश करा.

मधुमेहाच्या रूग्णांनी दुपारच्या वेळी लिंबू पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. मात्र, फक्त लिंबू आणि पाणीच सेवन करा. बरेच लोक लिंबू पाणी म्हटंले की, लगेचच साखर पण टाकतात मात्र असे अजिबात करू नका. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)