
वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) हा एकदम फिट आहे. मिलिंद सोमणसारखं तुम्हालाही फिट राहायचं असेल तर त्याचा सहजसोपा डाएट प्लॅन फॉलो करू शकता. त्याचं हे रुटीन अत्यंत साधंसोपं आणि सहज आत्मसात करण्यासारखं आहे.

अर्धा लिटर पाणी प्यायल्यानंतर मिलिंदच्या दिवसाची सुरुवात होते. हे पाणी अती थंड किंवा अती गरम नसावं. रुम टेम्परेचरं पाणी पिऊन तो दिवसाची सुरुवात करतो. त्यानंतर सकाळी 10 वाजताच्या आत तो नाश्ता करतो. नाश्त्यामध्ये एखादं फळ, शक्यतो ऋतुनुसार उपलब्ध असणारे फळ आणि त्यासोबत तो सुका मेवा खातो.

दुपारी 2 वाजताच्या आत तो जेवतो. दुपारच्या जेवणात भात आणि भाजी किंवा दाल खिचडीचा समावेश असतो. डाळ किंवा भातापेक्षा अधिक प्रमाणात भाजी खात असल्याचं त्याने सांगितलं. त्याचप्रमाणे भातावर दोन चमचे घरी बनवलेलं साजूक तूप तो घेतो.

मिलिंद मांसाहार फार करत नाही. अगदीच कधीतरी किंवा महिन्यातून एकदा तो थोड्या प्रमाणात चिकन किंवा मटण किंवा अंड खातो. त्याचप्रमाणे दररोजच्या दुपारच्या जेवणात कधी कधी भाताऐवजी तो सहा चपात्या भाजी आणि डाळसोबत खातो.

संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास तो गुळाचा कोरा चहा पितो. त्यानंतर संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास किंवा सुर्यास्तापूर्वीच तो रात्रीचं जेवण करतो. रात्रीच्या जेवणात एखादी भाजी आणि भुकेनुसार खिचडीचा समावेश असतो. रात्री कधीच मांसाहार करत नसल्याचं मिलिंदने स्पष्ट केलं. तर रात्री झोपताना तो हळद आणि गूळ टाकलेलं कोमट पाणी पितो.