
लातूर : लातूरमध्ये गॅस बुकिंग नंबर्स बंद पडल्याने ग्राहकांनी एजन्सी बाहेर सिलेंडर मिळवण्यासाठी लांब रांगा लावल्या आहेत. गॅस तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्यामुळे नागरिकांची सिलेंडर मिळविण्यासाठी धावपळ सुरू आहे.

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये गॅस संपण्याच्या भीतीने नागरिकांनी गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घरगुती गॅस सिलेंडर मिळणार नाही या भीतीने अनेक नागरिक एजन्सीवर येऊन गॅस बुकिंग करत आहेत. त्यामुळे एजन्सी परिसरात काहीसे गोंधळाचे वातावरणही निर्माण झाले आहे.

जळगाव : जळगावात बी.जे मार्केट येथील भारत गॅस एजन्सीच्या केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. ऑनलाइन बुकिंग होत नाही तसेच बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महिनाभरापूर्वी बुकिंग केलेले देखील सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील वरठी (भंडारा रोड) येथे सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनी आहे. या ठिकाणी स्टील वितळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात एलपीजीचा वापर केला जातो. युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने कारखान्यात एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

यवतमाळ : गरीब आणि गरजू यांच्या आहारासाठी 2020 मध्ये शिवभोजन थाळी ही योजना सुरू करण्यात आली. मात्र आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका राज्यातील 1871 शिवभोजन केंद्रांना बसणार आहे. व्यवसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत न झाल्यास केंद्र बंद पडण्याची शक्यता आहे.

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रात नियमित गॅस पुरवढा सुरु आहे. मात्र भविष्यात युद्धजन्य परिस्थितीमुळे जर गॅसचा तुटवडा जाणवला तर अन्नछत्रात अन्न शिजवण्यासाठी पारंपारिक पद्धतीचा म्हणजे चुलीवर आणि डिझेल शेगडी च्या माध्यमातून अन्न शिजवले जाणार आहे अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

मुक्ताईनगर : व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायिकांवरही मोठा परिणाम झाला आहे. गॅस मिळत नसल्याने युद्ध परिस्थिती थांबेपर्यंत हॉटेल बंद करावे लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी म्हटले आहे.