अभिनेत्री थरथरत होती, ओठ नीळे पडले…26 वर्ष जुनं रॉमेन्टीक गाणं शुट करताना असे झाले हाल; मात्र गाणं बनलं अजरामर
बॉलिवूडमधील रोमँटिक गाणी पाहायला सुंदर वाटतात. मात्र, त्यामागे कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. माधुरी दीक्षितची अलास्कातील शुटिंगदरम्यान अवस्था खराब झाली होती. शिफॉन साडीतील रोमँटिक गाण्याचा किस्सा पुन्हा आता चर्चेत आला आहे. माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या ‘किस्मत से तुम हमको मिले हो’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यान असंच काही घडलं.

‘पुकार’ चित्रपटातील हे गाणे अलास्काच्या बर्फाच्छादित परिसरात चित्रित करण्यात आले होते. माधुरीने या गाण्यात हलक्या रंगाची शिफॉन साडी नेसली होती, तर अनिल कपूर यांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी कपड्यांचे अनेक थर घातले होते.
शूटिंगदरम्यान संध्याकाळ झाल्यानंतर थंडी आणखी वाढली होती. त्यामुळे माधुरीचे ओठ निळे पडू लागले आणि गाण्याचे लिपसिंक करणेही तिला कठीण झाले होते.
कोरिओग्राफर फराह खान माधुरीला गाण्याच्या तालावर लिपसिंक करण्यास सांगत होत्या. मात्र, थंडीमुळे तिचे ओठ हलवणेही कठीण झाले आणि उपस्थित डॉक्टरांनी शूटिंग थांबवण्यास सांगितले.
दुसऱ्या दिवशी शूटिंग सुरू झाल्यानंतर माधुरीला उब मिळावी यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. तिचा सीन पूर्ण होताच एक व्यक्ती तिच्यासाठी ब्लँकेट घेऊन येत असे आणि तिला गरम ठेवण्यासाठी हीटरची व्यवस्थाही करण्यात आली होती.
अनिल कपूर यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये या गाण्याशी संबंधित किस्सा सांगितला होता. माधुरीची साडी वाऱ्यामुळे उडावी यासाठी हेलिकॉप्टर आणण्यात आले होते, त्यामुळे तिच्यासाठी शूटिंग आणखी आव्हानात्मक ठरले. या गाण्याला सोनू निगम आणि अनुराधा पौडवाल यांनी आवाज दिला होता. ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे आजही चाहत्यांच्या पसंतीस उतरते.