
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचे लाखो चाहते आहेत. नुकतीच ती यूएस, कॅनडामधील ‘मीट अँड ग्रीट माधुरी’ या शोमुळे चर्तेत आली. ती प्रेक्षकांच्या भेटीसाठी स्कीनवर कधी येणार याची अनेकांना उत्सुकता आहे. आता तिच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर खुद्द माधुरीनेच शेअर केली आहे. तिने तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली असून यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत ती काम करणार आहे.

माधुरीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर पहिला टीझर शेअर करत तिच्या आगामी सीरिजची घोषणा केली आहे. ‘मिसेस देशपांडे’ या सायकोलॉजिकल थ्रिलर प्रोजेक्टमध्ये माधुरी झळकणार असून नागेश कुकनूरचे नावह या प्रोजेक्टशी जोडलं गेलं आहे. एवढंच नव्हे तर या सीरिजमध्ये एक मराठमोळा चेहरा, आघाडीचा अभिनेताही माधुरीसोबत दिसणार आहे.

JioHotstar वर ही सीरिज लवकरच प्रदर्शित होणार असली तरी त्याची थीम, स्टोरी नक्की काय आहे, रिलीज डेट काय याबद्दल फारशी माहिती शेअर करण्यात आलेली नाही. माधुरीने ‘मिसेस देशपांडे’ ची पहिली झलक शेअर केल्यावर चाहत्यांनी या टीझरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मराठी मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज या माध्यमांतून घराघरांत पोहोचलेला, लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा धकधक गर्ल माधुरी दीक्षितसह स्क्रीन शेअर करणार आहे. त्याचीही यात महत्वाची भूमिका असणार आहे. सिद्धार्थने नुकतीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरीमध्ये या सीरिजची झलक शेअर केली आणि ‘My Next’ अशी कॅप्शनही दिली. चाहते त्याला धकधक गर्लसोबत पाहण्यास खूपच उत्सुक आहेत.

यात पहिल्यांदा माधुरी एका सुंदर पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दागिन्यांनी मढलेली अशी आरशासमोर बसलेली दिसते. हळूहळू ती तिचे एकेक दागिने उतरवते , मेकअपही पुसते आणि पुढच्याच क्षणी ती एका वेगळ्याच, गूढ लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येते. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, गूढ हसू पाहून या सीरिजबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे प्रख्यात दिग्दर्शक नागेश कुकनूर यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.