
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनतेने अनेक ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी पाहायला मिळत आहे.

मुंबईतील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये लस घेण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी जमली आहे.

एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे अनेक नागरिक शक्य तितक्या लवकर जाऊन लसीकरण करुन घेत आहे.

त्यामुळेच मुंबईतील बीकेसी कोव्हिड सेंटरवर कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. तात्कळत उन्हात उभे राहायला लागत असल्याने अनेक नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहे.

मुंबईतील लसीकरण केंद्रावर आज दुपारी 12 नंतर कोरोना लसीकरण सुरु होणार आहे. मात्र तरीही अनेक नागरिकांनी पहाटेपासून लसीकरण केंद्रांबाहेर रांगा लावलेल्या पाहायला मिळत आहेत.

मुंबईत 136 पैकी 73 खाजगी लसीकरण केंद्र आहेत. त्यातील 40 लसीकरण केंद्र लस नसल्याने बंद राहणार आहेत.

तर जी केंद्र सुरु राहणार आहेत, त्यात बहुतांश दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

मुंबईतील जम्बो कोव्हिड सेंटरसह गोरेगावच्या नेस्को केंद्रावर दोन किमीपर्यंत गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच अनेक पालिका रुग्णालयांबाहेर अशाचप्रकारे लस घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे.

कोरोना लसीकरणासाठी झालेल्या गर्दीत नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे कोरोना कसा रोखणार असा सवाल उपस्थित होत आहे.