
सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ या गावाची महत्ती राज्यातच नाही तर देशभर आहे. हे गावच तसं अनोखं आहे. कारण येथील लोक कोब्रा सापासोबत राहतात. सापांची पूजा करतात. सापाला हे लोक कुटुंबातील सदस्य मानतात. करमाळा जवळील या गावाची ख्याती देशभरात पसरलेली आहे.

अनेक लोक जशी पाळीव प्राणी पाळतात. तसेच इथले लोक सापांसोबत राहतात. साप हा जणू त्यांच्या घरातील खास सदस्य आहे. घरातील लहान मुलं सापांसोबत खेळतात. विशेष म्हणजे हे काही बिनविषारी साप नाहीत. तर त्यामध्ये अत्यंत विषारी सापांचा, कोब्रा या जातींच्या सापाचाही समावेश आहे.

या गावातील प्रत्येक घरात तुम्हाला साप दिसतील. इथल्या लोकांच्या स्वयंपाक घरापासून ते शयनगृहापर्यंत सापाचा आदिवास आहे. कुठे नं कुठे साप हा दिसलेच. एकाच छताखाली माणूस आणि साप राहतात. या सापांसोबत मुलं खेळतात. त्यांना दूध पाजतात.

शेटफळमधील गावकऱ्यांना कधीही सापाची भीती वाटत नाही. सापांना कसं हाताळावं, त्यांना कसं पकडावं यात त्यांचा वकूब आहे. हे ज्ञान त्यांना त्यांच्या पुर्वजांकडून मिळालेले आहे. अनेक वर्षांपासून ते सापांसोबत राहतात. त्यांना साप चावण्याची, दंश होण्याची कोणतीही भीती वाटत नाही.

ही लोक सापाला भगवान शंकराचे, शिवाचे प्रतिक मानतात. या गावात शंकराची आणि सापाची मंदिरं आहेत. इथं अनेक शिळा आहेत. ज्यावर साप आणि नाग कोरलेले आहेत. त्याची ही लोकं पूजा करतात. नागपंचमीला तर इथं अभूतपूर्व सोहळा असतो. अनेक पर्यटक खास या गावाला भेट देण्यासाठी येतात.

राज्यात सापांची पूजा करणारे इतरही अनेक गावं आहेत. पण सापांसोबत राहणारे शेटफळ येथील गावकरी हे एकमेव मानावे लागतील. येथील घराच्या छतावर, किचनपासून ते बेडरुमपर्यंत अत्यंत जहाल सापांचा वावर अत्यंत सहज असतो. येथील नागरिकांना सापाची भीती वाटत नाही. उलट सापांना ते मित्र मानतात.