
देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतल्या कर्तव्य पथावर लष्करी संचालन पार पडलं. त्यानंतर आपापल्या संस्कृतीचं प्रदर्शन करणारे विविध राज्यांचे चित्ररथ पहायला मिळाले. यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथही त्यात सहभागी करण्यात आला होता.

'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाची सजावट करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचं दर्शन घडलं. या चित्ररथावर अष्टविनायकांच्या प्रतिकृती, ढोल वाजवणारी मराठमोळी महिला आणि गणेशाची मूर्ती साकारणारे मूर्तीकार पहायला मिळाले.

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख उत्सवांपैकी एक आहे. या काळात राज्यात तब्बल 60 ते 70 लाख कोटींची उलाढाल होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत या मोहिमेला कशी चालना मिळते, याचा संदेश महाराष्ट्राच्या चित्ररथातून देण्यात आला आहे.

लोकमान्य टिळकांनी जनतेला एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात केली. मुंबईसह महाराष्ट्रातमू अत्यंत उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. मूर्तीकार, सजावट यातून मिळणारा रोजगार आणि होणार आर्थिक उलाढाल हा विषय या चित्ररथातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

गणेशोत्सवातील ढोलपथक हासुद्धा आकर्षणाचा विषय असतो. पारंपरिक पोशाखातील महिला ढोल वाजवत गणपती बाप्पाचं स्वागत करतात. महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन या चित्ररथातून होत आहे.

प्रजासत्ताक दिनी सहभागी होणाऱ्या विविध राज्यांच्या चित्ररथांमधून भारताची संस्कृती आणि प्रगती दाखवली जाते. देशातील विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालयांमधून चित्ररथ निवडण्याची प्रक्रिया काही महिने आधीच सुरू होते. संरक्षण मंत्रालयाकडून अनेक फेऱ्यांच्या निवड प्रक्रियेनंतर हे चित्ररथ सादर केले जातात.