Weather Alert : महाराष्ट्रावर दुहेरी संकट, सोमवारी वातावरणात मोठे बदल, हवामान खात्याचा अंदाज काय?
Weather Alert : काल पासून संपूर्ण राज्यात हवामानात मोठे बदल झाल्याचे चित्र आहे. दिवसा कडाक्याचे ऊन आणि रात्री थंडी हे महाराष्ट्रातील नागरिकांना अनुभवायला मिळत आहे.

राज्यात पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर हवामानात स्पष्ट बदल दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाऊस पूर्णपणे थांबल्याने तापमान हळूहळू खाली येऊ लागले आहे. त्यामुळे दिवसा उन्हाची तीव्रता जाणवत असताना रात्री मात्र गारवा वाढत आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना सध्या दिवसा वेगळे आणि रात्री वेगळे वातावरण अनुभवता येत आहे.
कोकणासह संपूर्ण राज्यात थंडीची चाहूल सुरू झाली असून, पुढील चार ते पाच दिवस बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या कोणताही हवामान इशारा जारी करण्यात आलेला नाही.
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव परिसरात सकाळी तुलनेने उष्ण तर रात्री थंड वातावरण जाणवत आहे. या भागात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील आणि पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि आसपासच्या परिसरात कोरडे हवामान कायम राहणार आहे. कमाल तापमान २९ अंश तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. हवेत थोडी आर्द्रता असली तरी रात्रीच्या तापमानात घट झाल्याने गारवा स्पष्ट जाणवू लागला आहे.
मराठवाड्यातही हवामान कोरडे अनुभवास येत आहे. कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस हेच कोरडे आणि उष्ण वातावरण कायम राहील, असा अंदाज आहे.
विदर्भात पावसाने उघडीप दिल्यानंतर थंडीची चाहूल लागली आहे. या भागात कमाल तापमान ३१ अंश तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. पुढील चार ते पाच दिवस पावसाचा कोणताही इशारा नसून कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.
एकूणच, राज्यात सध्या दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे मिश्र वातावरण आहे. दिवाळी जवळ आल्याने थंडीचा प्रभाव हळूहळू वाढत असून, पुढील चार ते पाच दिवस प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.