
पावसाळा सुरू होण्यासााठी अजून दोन महिने बाकी आहेत. मात्र, त्यापूर्वीच हवामानात मोठा बदल झाला आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

पावसाने अचानक हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी उकाड्यातून नागरिकांची सुटका झाली आहे. पण शेतकरी मात्र रडकुंडीला आलं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक पावसामुळे वाया गेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

राज्यातील अनेक भागात पीक जमीनदोस्त झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काय करावं आणि काय नाही? असा प्रश्न पडला आहे. सरकारकडूनही नुकसान भरपाईबाबतचा चकार शब्द काडला जात नाहीये, त्यामुळे बळीराजाला वाली कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा लोडशेडिंग आणि पाण्याची टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी वेगळा प्रयोग केला. कमी पाण्यावर चांगले उत्पादन देणाऱ्या मका पिकांची तालुक्यात 2300 हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली होती.

मात्र, काल आणि आज आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे तालुक्यातील 50 टक्के मका पीक जमीनदोस्त झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे तालुक्यातील अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा कर्जाच्या बोज्याखाली दबलेला शेतकरी आत्महत्येकडे वळण्याची शक्यता आहे, याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून कृषी विभाग आणि प्रशासनाकडे केली जात आहे.