
उन्हाळा सुरु झाला की सर्व खवय्यांना पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे आंबा. सर्व फळांचा राजा असलेला आंब्याची चव वर्षातून एकदाच चाखता येतो. एप्रिल, मे महिना उजाडताच बाजारात आंब्यांची रेलचेल सुरू होते. गोड, आंबट, रसाळ आंबे खायला प्रत्येकाला आवडतात.

पण तुम्हाला माहितीये का भारतात आंब्याच्या तब्बल १५ प्रजाती आढळतात. या प्रजाती नेमक्या कोणत्या, त्यांचा इतिहास काय, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

प्रत्येक आंब्याची चव, रंग आणि रूप वेगळे असते. हापूस, तोतापुरी, लंगडा, दशहरी हे आंबे जास्त प्रमाणात खाल्ले जातात. पण, या आंब्याच्या नावामागे एक विशिष्ट कथा दडलेली आहे. या लेखात आपण आंब्याच्या वेगवेगळ्या नावांची कहाणी जाणून घेणार आहोत.

हापूस - महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात विशेषत: रत्नागिरी आणि देवगडमध्ये हा आंबा पिकवला जातो. 16 व्या शतकात भारतात आलेल्या पोर्तुगीज जनरल आणि शोधक अल्फोंसो डी अल्बुकर्क यांच्या नावावरून या आंब्याचे नाव ठेवण्यात आले. पोर्तुगीजांनी भारतात आंब्याची कलम करण्याची नवीन पद्धत आणली. ज्यामुळे उच्च प्रतीच्या जाती विकसित झाल्या आणि अल्फांसो त्यापैकीच एक आहे. हा आंबा चवीला अप्रतिम, सुगंधित आणि लोण्यासारखा मऊ असतो.

चौसा आंबा: उत्तर प्रदेशात, विशेषतः बागपत आणि सहारनपूर भागात चौसा आंबा खूप प्रसिद्ध आहे. 1539 मध्ये शेर शाह सूरीने हुमायूंवर चौसा (बिहार) मध्ये मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ या आंब्याचे नाव ठेवण्यात आले. शेर शाह या आंब्याचे मोठे चाहते होते. त्यांनी आपल्या विजयाची आठवण कायम राहावी म्हणून याला ‘चौसा’ असे नाव दिले. हा आंबा चवीला अत्यंत गोड आणि रसाळ असतो.

तोतापुरी आंबा: तोतापुरी आंबा दक्षिण भारतात म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये आढळतो. हा आंब्याचा आकार पोपटाच्या चोचेसारखा असतो. त्याचे टोक चोचेप्रमाणे टोकदार असते. हा आंबा इतर जातींच्या तुलनेत थोडा कमी गोड असतो. पण त्याचा सुगंध आणि लांब आकारामुळे याची खास ओळख असते.

पायरी आंबा : पायरी आंबा हा बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या पहिल्या जातींपैकी एक आहे. त्याची साल लालसर आणि आंबट चवीची असते. गुजरातमध्ये आमरस बनवण्यासाठी या आंब्याचा वापर केला जातो.

लंगडा आंबा : लंगडा हा आंब्याचा एक प्रसिद्ध प्रकार आहे, जो उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे आढळतो. या आंब्याची लागवड पाय नसलेल्या माणसाच्या शेतात पहिल्यांदा करण्यात आली होती. त्यामुळे त्याला लंगडा या नावाने ओळखले जाते. हा आंबा जुलै ते ऑगस्ट दरम्यान बाजारात आढळतो.