
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून जाहीर निषेध केला जातोय. छत्रपती संभाजीनगरमध्येही माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात एमआयएम या पक्षाने झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.

यावेळी एमआयएम पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. इम्तियाज जलील यांनी या हल्ल्याचा निषेध केला. तसेच आपल्या या निदर्शनादरम्यान, त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला. पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणाही जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. या निदर्शनानंतर एमआयएमचे कार्यकर्ते तसेच इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आंदोलनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. "जम्मू काश्मीरमध्ये सामान्य लोकांची हत्या करण्यात आली. त्याचा आम्ही पाकिस्तान मुर्दाबाद म्हणत तसेच पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर जाळत निषेध केला. पाकिस्तान ने जाती धर्माच्या भिंती उभ्या करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी या देशातील प्रत्येक नागरिक या घटनेची निंदा करत आहे. आम्ही सर्व एक आहोत आणि एक राहणार आहोत," अशा भावना जलील यांनी व्यक्त केल्या.

तसेच, "आज पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय पक्षाची बैठक बोलावली होती. आमचे म्हणणे आहे की उरीची घटना झाली होती, त्यावेळी तुम्ही अशीच मिटिंग बोलावली होती. पुलवामा झाले तेव्हाही अशीच बैठख बोलावण्यात आली. लोकसभेमध्ये मोदी यांनी धमाकेदार भाषण दिले होते. आम्ही ईट का जवाब पथर से देंगे, असे त्यांनी सांगितले होते. त्यावेळी कारवाई केली असती तर, पहलगाम झाले नसते, अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली.

आता मिटिंग भाषण करण्यापेक्षा कडक कारवाई करा. सर्व जगाने बघितले पाहिजे की, या देशावर कोणी नजर टाकली तर त्यांचे काय होते. काश्मीरमध्ये ठीक ठिकाणी सेना तैनात असून त्या ठिकाणी कोणतीही दहशतवादी कारवाई होणार नाही, असा दावा केला जात होता. 370 कलम हटवल्या नंतर तुम्ही स्वतःची पाठ थोपटत होते. आता सरकारने ठोस कारवाई केली पहिजे आणि आम्ही सरकार सोबत आहोत, अशी रोखठोक मागणी जलील यांनी केली.