
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नाची जोरदार चर्चा आहे. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांनी लग्न केलं. या लग्नावरून सोशल मीडियावर बरीच ट्रोलिंग झाली. मात्र एक काळ असा होता, जेव्हा एका अभिनेत्रीच्या आंतरधर्मीय लग्नावरून संपूर्ण मुंबई भडकली होती.

अभिनेत्री तन्वी आझमी यांनी सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी यांच्याशी लग्न केलं. त्याकाळी एका ब्राह्मण महाराष्ट्रीयन मुलीने मुस्लीम मुलाशी लग्न करणं ही खूप मोठी गोष्ट होती. या लग्नाच्या वेळी संपूर्ण मुंबई उफाळून आल्यासारखं वाटतं होतं, असं त्या अभिनेत्रीने सांगितलं.

एका मुलाखतीत तन्वी आझमी म्हणाल्या, "मी लहानपणापासून खूपच आज्ञाधारक होते. पण अचानकच माझ्यातील सुप्त बंडखोरीची भावना उफाळून आली होती. माझ्या लग्नाच्या वेळी मी खूप मोठं पाऊल उचललं होतं. त्यावेळी अनेकांना या जगाचा अंत झाल्यासारखं वाटत होतं."

तन्वी यांचे पती बाबा आझमी हे शबाना आझमी यांचे भाऊ आहेत. इतक्या मोठ्या कुटुंबाची सून असूनही माझ्यावर कधीच कोणता दबाव निर्माण झाला नाही, असंही त्यांनी सांगितलं.

तन्वी यांच्या सासरकडील कुटुंबात अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. तन्वी या प्रसिद्ध कवी आणि गीतकार कैफ आझमी आणि अभिनेत्री शौकत आझमी यांच्या सून आहेत. तर शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या वहिनी आहेत.