
मुंबईत सध्या विसर्जनाची धामधूम पाहायला मिळत आहे. मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. सध्या अनेक गणेशभक्त हे लालबाग परिसरात जमलेले पाहायला मिळत आहेत.

दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत मुंबईच्या राजाचा पहिला मान असतो. विसर्जनादिवशी गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईचा राजा जोपर्यंत मार्गस्थ होत नाही, तोपर्यंत मुंबईत कोणत्याही गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघत नाही.

त्यानुसार आज सकाळीच ७.३० च्या दरम्यान बाप्पाच्या निरोपाची आरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी ८ ते ८.३० च्या दरम्यान मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. गणेश गल्लीपासूनच मोठ्या थाटात वाजत गाजत ही मिरवणूक सुरु आहे.

गणेश गल्लीच्या राजाच्या विसर्जन मिरवणूक ही गणेश गल्लीतील मंडपातून निघाली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईच्या राजाला विसर्जनासाठी पहिला मान मिळाला.

सध्या मुंबईच्या राजाची मिरवणूक ही लालबाग परिसरात दाखल झाली आहे. सध्याची ही विसर्जन मिरवणूक अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत आहे. मुंबईच्या राजाचा रथ फुलांनी आणि हारांनी सजवण्यात आला आहे.

त्यासोबतच राजाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी मोठे मोठे हार, फटाके फोडत बाप्पाचे विसर्जन थाटामाटात केले जात आहे. या मिरवणुकीमुळे मुंबईतील लालबाग परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबईच्या राजाच्या ही विसर्जन मिरवणूक लालबाग परिसरातून गिरगाव चौपाटीच्या दिशेने रवाना होईल. गिरगाव चौपाटीवर अतिशय भक्तीभावाने बाप्पाला समुद्रात निरोप दिला जाईल.

या मिरवणुकीनंतर आता मुंबईतील इतर मोठ्या मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. तसेच परळच्या राजाचीही विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे.