
मुंबईत पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात हाहाकार पाहायला मिळत आहे. मुंबईसह ठिकठिकाणी पडणाऱ्या सततच्या पावसामुळे शहराचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. यामुळे अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई शहराच्या काही भागांमध्ये ३०० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. तसेच पुढील १२ ते १४ तास अशाच प्रकारचा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सेवा पावसामुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कुर्ला आणि चुनाभट्टीदरम्यानची लोकल वाहतूक सकाळी ११:२० पासून बंद करण्यात आली.

तसेच वडाळा आणि शिवडीजवळ रुळांवर पाणी साचल्यामुळे गाड्या अर्धा तासापेक्षा जास्त उशिराने धावत आहेत. डॉकयार्ड स्टेशनजवळ थांबलेल्या ट्रेनमधून प्रवासी खाली उतरून रुळांवरून चालत प्रवास करत असल्याचे दिसून आले आहे.

मध्य रेल्वेवर कुर्ला आणि सायनदरम्यानच्या अप-फास्ट आणि डाउन-फास्ट लोकल सकाळी ११:२५ पासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून, सकाळी ११:४५ पासून स्लो लोकल सेवाही स्थगित करण्यात आली आहे. रेल्वे अधिकारी रुळांवरील पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत.

मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पाणी पातळी धोक्याची पातळी ओलांडून ३.९० मीटरवर पोहोचली आहे. यामुळे नदीकाठच्या सखल भागांमध्ये पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.

ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेने (BMC) तात्काळ कारवाई करत कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरसारख्या भागातील अनेक रहिवाशांना जवळच्या सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

सध्या एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी काम करत आहे. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक घराबाहेर न पडण्याचा आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईतील आतापर्यंतच्या पावसाची आकडेवारी समोर आली आहे. यानुसार 18 ऑगस्टच्या सकाळी 8 ते 19 ऑगस्टच्या सकाळी 8 वाजेपर्यंत मुंबई शहरात 186.43 मिमी पाऊस झाला आहे.

तर पूर्व उपनगरांत 208.78 मिमी आणि पश्चिम उपनगरांत 238.19 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने आज मुंबई शहर आणि उपनगरांत अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.