
'स्त्री', 'भेडिया' यांसारख्या हॉरर-कॉमेडी चित्रपटांच्या यशानंतर आता दिनेश विजनने 'मुंज्या' प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. शुक्रवारी 7 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या वीकेंडपर्यंत दमदार कमाई केली आहे. येत्या काही दिवसांत कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

'मुंज्या' या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठी दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने केलं आहे. अवघ्या 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात शर्वरी वाघसुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

'मुंज्या'ने पहिल्या दिवशी 4.21 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 7.40 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 8.43 कोटी रुपये कमावले. त्यामुळे पहिल्या वीकेंडपर्यंत या चित्रपटाची कमाई 20.04 कोटी रुपये इतकी झाली. या चित्रपटातील 'मुंज्या' हा CGI द्वारे साकारण्यात आला आहे.

'मुंज्या' या चित्रपटात अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंग, सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात शर्वरीचा आयटम साँग असून त्याला सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. शर्वरीच्या करिअरमधील हा उल्लेखनीय चित्रपट ठरतोय.

या चित्रपटात बिट्टूची भूमिका साकारणारा अभिनेता अभय वर्माच्या लोकप्रियतेतही चांगलीच वाढ होताना दिसतेय. अभय वर्मा हा सोशल मीडियावर अनेक तरुणींचा नवीन 'नॅशनल क्रश' ठरतोय.