
साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांचा छोटा मुलगा अखिल अक्किनेनी याने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. गर्लफ्रेंड झैनाब रावदजी हिच्यासोबत त्याने आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या दोघांचा साखरपुडा पार पडला होता.

अखिल आणि झैनाब गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. 26 नोव्हेंबर 2024 रोजी या दोघांनी साखरपुडा केला. आता हिंदू विवाहपद्धतीनुसार या दोघांनी कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत धूमधडाक्यात लग्न केलंय.

लग्नानंतर या दोघांचा पहिला फोटो समोर आला आहे. हैदराबादमध्ये हा लग्नसोहळा पार पडला असून त्यात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारसुद्धा उपस्थित होते. चिरंजीवी, रामचरण, प्रशांत नील यांसारखे सेलिब्रिटी या दोघांना आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले होते.

झैनाब ही उद्योगपती झुल्फी रावदजी यांची मुलगी आहे. झुल्फी यांचं बांधकाम व्यवसायात मोठं नाव आहे. झैनाब स्वत: एक कलाकार असून ती भारत, दुबई आणि लंडन अशा तिन्ही देशात राहिली आहे. झैनाब तिच्या पेंटिंग्ससाठी विशेष ओळखली जाते.

अखिल हा नागार्जुन आणि त्यांची दुसरी पत्नी आमला यांचा मुलगा आहे. नाग चैतन्य हा त्याचा सावत्र भाऊ आहे. अखिलने याआधी 2016 मध्ये श्रिया भुपालशी साखरपुडा केला होता. 2017 मध्ये दोघं लग्न करणार होते. मात्र लग्नापूर्वीच त्यांचा साखरपुडा मोडला.