Nana Patekar Farmer Help : नाना पाटेकरांच्या निधनाने हजारो शेतकरी पोरके; उद्ध्वस्त कुटुंबांना दिलेला मायेचा आधार
नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने लाखो-करोडो प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप पाडली. मात्र, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख केवळ रुपेरी पडद्यापुरती मर्यादित राहिली नाही. दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांच्या मनातही नाना पाटेकर यांच्याबद्दल एक वेगळीच आपुलकी निर्माण झाली. अभिनयासोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नानांचे हे कार्य त्यांच्या चाहत्यांसाठी कायम प्रेरणादायी राहिले.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने सिनेसृष्टीसोबतच सामाजिक क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या नाना पाटेकरांनी समाजातील वंचित आणि संकटग्रस्त घटकांसाठीही मोठं योगदान दिलं. विशेषतः शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी त्यांनी मकरंद अनासपुरे यांच्या साथीने उभारलेलं ‘नाम फाऊंडेशन’ आज त्यांच्या सामाजिक कार्याची मोठी ओळख ठरलं आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजेच शेतीचा आधार. पावसाने साथ सोडली की दुष्काळ, नापिकी, आर्थिक अडचणी आणि कर्जाचा वाढता बोजा अशा संकटांची मालिका सुरू होते. या कठीण परिस्थितीत अनेक कुटुंबांवर मोठं संकट कोसळतं. अशा कुटुंबांना पुन्हा उभं करण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी पुढाकार घेतला आणि ‘नाम फाऊंडेशन’ची स्थापना केली.
2015 मध्ये सुरू झालेल्या या संस्थेने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. मराठवाडा, विदर्भासह खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पोहोचत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासोबतच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही हातभार लावण्यात आला. संकटात सापडलेल्या कुटुंबांना केवळ मदत न करता त्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
‘नाम’च्या कामाचा मोठा भाग जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनावर केंद्रित राहिला. पाणी अडवणे, पाणी जमिनीत मुरवणे, बंधारे उभारणे आणि जलस्रोत विकसित करणे अशा विविध माध्यमातून गावांमध्ये पाण्याची उपलब्धता वाढवण्याचे प्रयत्न झाले. स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांना या कामांमध्ये सहभागी करून घेत अनेक गावांमध्ये शेतीसाठी पाण्याची परिस्थिती सुधारण्यात आली.
नाना पाटेकर यांनी संस्थेची स्थापना करून केवळ पडद्यामागे राहण्याऐवजी स्वतः मैदानात उतरून काम केलं. दुष्काळग्रस्त भागांना भेटी देत त्यांनी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. पती गमावलेल्या महिलांना आर्थिक आधार देण्यापासून ते आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करण्यापर्यंत विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला.
नाम फाऊंडेशनच्या माहितीनुसार, संस्थेने आतापर्यंत 50 हजारांहून अधिक कुटुंबांना मदत केली असून हजारो विधवा महिलांना आर्थिक पाठबळ दिलं आहे. शहीद जवानांच्या कुटुंबांनाही संस्थेकडून मदत करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील हजारो गावांमध्ये जलसंधारणाची कामं झाल्याने मोठ्या संख्येने नागरिकांना पाण्याचा लाभ मिळाला आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ आर्थिक मदतीपुरत्या मर्यादित नसून त्यांच्या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्याचं कामही नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी केलं. शेतमालाला योग्य भाव मिळावा, दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती सुधारावी आणि शेतकऱ्यांना जगण्याचा आधार मिळावा, यासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यामुळे ‘नाम फाऊंडेशन’ हे केवळ मदत करणाऱ्या संस्थेपुरतं न राहता अनेकांसाठी आशेचा आधार ठरलं आहे.