
व्हॉटसअॅप ग्रुपमुळे रुसून घराबाहेर पडलेला मुलगा नऊ वर्षांनंतर कुटुंबांना सापडलाय. नांदेडच्या हदगांव तालुक्यातील मनूला इथला 21 वर्षीय अरविंद गायकवाड हा नऊ वर्षांपूर्वी घरातून रुसून निघून गेला होता.

सुरुवातीला दोन वर्षे त्याच्या कुटुंबाने त्याचा खूप शोध घेतला. मात्र त्यानंतर आई-वडिलांनी आशाच सोडून दिली.

या दरम्यान हा मुलगा पुण्याला जाऊन पोट भरण्यासाठी मिळेल ते काम करत होता.

पुण्यातील एका चहावाल्याने त्याची चौकशी केली असता त्याची व्यथा त्याला कळाली. त्यानंतर चहावाला श्रीकांत गोगा यांनी व्हॉटसअॅपच्या ग्रुपमध्ये कुटुंबाची ताटातूट झालेल्या अरविंद बाबत पोस्ट टाकली.

व्हॉटसअॅप वरची ही पोस्ट अरविंदच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन जाधव, गजानन जाधव यांच्यापर्यंत पोहोचली. या सामाजिक कार्यकर्त्याने आपल्या गावातील या मुलाला आणण्यासाठी चारचाकी वाहन करत पुणे गाठले.

हडपसर भागात दिवसभर शोधाशोध केल्यानंतर अरविंद सापडला. सध्या अरविंद व्यवस्थित असला तरी कोरोना काळातील बेकारीने तो खंगुन गेला होता.

अरविंदला घेऊन कार्यकर्त्यांनी त्याचे गाव गाठून कुटुंबाच्या स्वाधीन केलंय.

सुमारे नऊ वर्षांनंतर अरविंदची गाठभेट झाल्याने कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झालाय. सोशल मीडियाच्या वापरातून घडलेल्या या कृतीचे जिल्ह्यात मोठे कौतुक होतंय.