
सर्वसामान्यपणे गरीब घरातली मुलं अंगणवाडीत प्रवेश घेतात, असा अनेकांचा समज असतो. परंतु नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी हा समज मोडीत काढला आहे. त्यांनी त्यांच्या जुळ्या मुलांना अंगणवाडीत प्रवेश घेतला आहे.

नंदूरबार शहरापासून तीन ते चार किलोमीटरवर असलेल्या टोकरतलाव इथल्या अंगणवाडीत त्यांनी मुलांसाठी प्रवेश घेतला आहे. या अंगणवाडीतल्या सेविका आणि मदतनीसांनी तयार करुन घेतलेल्या झोळीची कल्पना मिताली यांना खूप आवडली होती. त्यानंतरच त्यांनी हा निर्णय घेतला.

शुकर आणि सबर या आपल्या जुळ्या मुलांना त्यांनी टोकरतलावच्या अंगणवाडीत घातलं आहे. या ठिकाणी शाळा आणि अंगणवाडी एकाच प्रांगणात असल्याने दोन्हींवर लक्ष ठेवता येईल, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलंय.

त्याचसोबत जिल्ह्यातल्या इतर अंगणवाड्यांमध्ये काय सुधारणा करता येईल, याबाबत जातीनं लक्ष घालता येईल, या उद्देशाने मुलांचा प्रवेश अंगणवाडीत केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय.

सामाजिक दायित्वातून जिल्हाधिकारी मिताली यांनी उचललेलं हे पाऊल इतरांसाठी प्रेरणादायी आणि कौतुकास्पद असल्याचं म्हटलं जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कल्पनेमुळे इतर अंगणवाड्यांचीही अवस्था सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.