
79 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. यंदाचं त्यांचं ते भाषण 12 वं स्वातंत्र्यदिनाचं भाषण होतं. दरवर्षीचं त्यांचं भाषण एका अनोख्या शैलीत असतं. त्याचप्रमाणे त्यांचा पोशाखसुद्धा दरवर्षी चर्चेचा विषय ठरतो.

यावर्षी त्यांनी पांढरा कुर्ता आणि त्यावर भगवं नेहरू जॅकेट परिधान केलं होतं. त्याचसोबत डोक्यावर भगवा फेटा आणि गळ्यात तिरंग्याचा शॉल होता. दरवर्षी स्वातंत्र्यदिनी परिधान केलेल्या पोशाखातून मोदी राष्ट्रीय एकता, सांस्कृतिक वारसा आणि देशभक्तीचा संदेश देतात.

दरवर्षी स्वातंत्र्यदिनाची एक थीम ठरवली जाते. यंदाची थीम 'नया भारत' (नवीन भारत) अशी होती. 2047 पर्यंत विकसित भारत साकार करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाचं हे प्रतीक आहे.

दरवर्षी स्वातंत्र्यदिनी मोदींच्या पगडीची विशेष चर्चा असते. त्यांच्या पगडीचा रंग, त्याचा कापड आणि ती बांधण्याची पद्धती.. याकडे सर्वांचं लक्ष वेधलं जातं. यंदाचाही त्यांचा भगवा फेटा विशेष चर्चेत आला आहे.

ऑपरेशन सिंदूरला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात ऑपरेशन सिंदूर, राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास आणि कल्याणकारी योजनांचा उल्लेख केला.