
दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह (73) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. एनडीएमध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या सत्ता सहभागाविषयीच्या एका प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी मोदींना चिमटा काढला. मोदींसाठी हा पाठिंबा कडू औषध घेण्यासारखं असल्याचा टोला त्यांनी हाणला.

'द वायर' चे पत्रकार करण थापर यांना त्यांनी मुलाखत दिली. "ही वेळ आत्मपरीक्षणाची आहे आणि नरेंद्र मोदी चतूर आहेत.", असे ते म्हणाले.

पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याची ही कृती मोदींसाठी एखादी कडू औषधी घशाखाली उतरविण्यासारखीच गोष्ट आहे. पण अडचण ही आहे की, ते आयुष्यभर आपणच पंतप्रधान असू, या भ्रमात असल्याचा चिमटा नसीरुद्दीन शाह यांनी काढला.

मोदी यांची अजून एक अडचण शाह यांनी सांगितली. ते प्रत्येक गोष्ट वैयक्तिक घेतात, त्यांचे सायकोपॅथ चाहते पण तसाच असल्याचा दावा अभिनेता शाह यांनी केला.

नरेंद्र मोदी यांना देश सेवाच करायची होती तर मग ते लष्करात का गेले नाही, असा सवाल त्यांना कोणी का विचारला नाही, असा टोला शाह यांनी लगावला.

"देवाने मला पाठविले आहे." या नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर नसीरुद्दीन शाह यांनी एका मुर्खाची कथा सांगितली.

याचा अर्थ तुम्ही नरेंद्र मोदींना उल्लू म्हणत आहात का? या पुढच्या प्रश्नावर नसीरुद्दी शाह म्हणाले, मी तसे म्हणालो नाही. मी घुबड म्हणालो.