
आजपासून देशभरात शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या काळात गरबा, दांडिया आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळतात.

आदिशक्तीच्या विविध रूपांची पूजा करण्यासाठी राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, धाराशिव, नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

या उत्सवाचे एक खास आकर्षण म्हणजे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे परिधान करणे. यंदाही नवरात्रीच्या प्रत्येक दिवसासाठी एक रंग ठरवण्यात आला आहे. त्यानुसार आजपासून बहुतांश लोक त्याच रंगाचे कपडे परिधान करताना दिसतात.

नवरात्रीत नऊ रंगांचे कपडे घालण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून लोकप्रिय झाली आहे. प्रत्येक दिवसाचा रंग देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो. या रंगांचे कपडे घातल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो, अशी लोकांची श्रद्धा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या परंपरेमागे कोणतेही धार्मिक कारण नाही. कोणताही धर्मग्रंथ विशिष्ट रंगाचे कपडे घालण्याचा नियम सांगत नाही. जर तुम्ही ठरवलेल्या रंगाचे कपडे घातले नाहीत, तर पाप लागेल किंवा देवीचा कोप होईल, असे काहीही नाही.

हे रंग फक्त त्या-त्या दिवसाच्या वारावरून ठरवले जातात. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये प्रत्येक वारासाठी एक विशिष्ट रंग दिला आहे. त्यानुसार हे रंग ठरवले जातात.

प्रत्येक आठवड्यात सात वार असतात आणि नवरात्रीचे नऊ दिवस असतात. त्यामुळे, जे दोन वार पुन्हा येतात, त्या दिवशी त्या रंगाचा सिस्टर कलर म्हणजेच जवळचा रंग निवडला जातो. यानुसार नऊ रंग ठरवले जातात.

या परंपरेचा मुख्य उद्देश सामाजिक एकोपा आणि समानता वाढवणे हा आहे. जेव्हा अनेक लोक एकाच रंगाचे कपडे घालतात, तेव्हा त्यांच्यात आपण सर्व एक आहोत अशी भावना निर्माण होते.

यामुळे आनंदाचे वातावरण तयार होते आणि सुरक्षिततेची भावना वाढते. कोणताही धर्मग्रंथ सांगत नसतानाही लोक स्वतःहून या परंपरेत उत्साहाने सहभागी होतात, हीच यामागची खरी गंमत आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)