
नुकताच श्रावण महिना सुरु झाला आहे आणि त्यासोबतच सणांनासुद्धा सुरुवात होत आहे. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी अनेक सण साजरे केले जातात आणि त्यातलाच एक महत्वाचा सण म्हणजे मंगळागौर.

नवविवाहित आणि सौभाग्यवती महिला हा सण साजरा करतात. झी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्येही अशी जोडपी आहेत, ज्यांची मालिकेत नुकतीच लग्न झाली आहेत. झी मराठीच्या नायिकांनी एकत्र येत 'नव दामपत्यांची मंगळागौर' साजरा केली आहे.

हा अनुभव कसा होता, त्याविषयी 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत लीलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री वल्लरी विराजने सांगितलं. ती म्हणाली, "माझा मंगळागौरीचा हा पहिलाच अनुभव होता. पण मला वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या घालण्यात खूप मज्जा आली."

"माझ्या गप्पा सर्वात जास्त अप्पी, शिवा आणि वसुंधराशी जमल्या होत्या. असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. त्रिफुला फुगडी, बस फुगडी, फुलपाखरू असे अनेक खेळ होते आणि ते खेळण्यात कस लागला. पण मज्जाही तितकीच आली," असं ती पुढे म्हणाली.

विशेष म्हणजे या खेळात लीलासोबत एजेसुद्धा सहभागी झाला होता. प्रेक्षकांना लवकरच मालिकेत हा क्षण पाहता येईल. 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.