NEET Paper Leak: मोठी बातमी! मोटेगावकरने स्वत:च्या मुलासाठी NEET पेपर फोडला? तपासात नको ते बाहेर आलं
NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या नामांकित क्लास RCC संस्थेचा संचालक शिवराज मोटेगावकरला दिल्लीच्या विशेष न्यायालयाने ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET UG) पेपरफुटी प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारी माहिती समोर आली आहे. लातूरमधील प्रसिद्ध 'आरसीसी' (RCC) कोचिंग इन्स्टिट्यूटचा संचालक शिवराज मोटेगावकर याला दिल्लीच्या विशेष न्यायालयाने ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. गेल्या दोन दिवसांच्या कसून चौकशीत सीबीआयच्या हाती मोटेगावकरविरोधात अत्यंत भक्कम पुरावे लागले असून, त्याने चक्क स्वतःच्या मुलासाठीच नीटचा पेपर फोडल्याचा दाट संशय सीबीआयला आहे.

सीबीआयने लातूर येथे शिवराज मोटेगावकरच्या घरावर टाकलेल्या छाप्यात तपासाला मोठे यश आले आहे. या झाडाझडतीत सीबीआयला त्याच्या घरातून चक्क 'केमिस्ट्री' (रसायनशास्त्र) विषयाची नीट परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका हस्तगत झाली आहे.

या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी लातुरामधून अटक करण्यात आलेला प्रा. कुलकर्णी याचा थेट संबंध जोडला जात आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या परीक्षा प्रक्रियेत कुलकर्णीकडे महत्त्वाची जबाबदारी होती. त्यानेच ही गोपनीय प्रश्नपत्रिका मोटेगावकरला पुरवल्याचा संशय आहे. घरातच थेट मूळ प्रश्नपत्रिका सापडल्यामुळे मोटेगावकरचा या घोटाळ्यातील थेट सहभाग आता पूर्णपणे उघड झाला आहे.

CBI सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी शिवराज मोटेगावकरचा स्वतःचा मुलगा देखील १२ वीत होता आणि त्याने नीटची परीक्षा दिली होती. आपल्या मुलाला वैद्यकीय प्रवेशासाठी (MBBS) जास्तीत जास्त गुण मिळावेत आणि तो डॉक्टर व्हावा, याच एका उद्देशाने मोटेगावकराने पेपरफुटीसारखा एवढा मोठा कायदेशीर धोका पत्करल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

मुलासाठी प्रश्नपत्रिका मिळवल्यानंतर मोटेगावकरने याचा व्यावसायिक गैरफायदा उठवल्याचा संशयही सीबीआयने व्यक्त केला आहे. आपल्याकडे आलेल्या या प्रश्नपत्रिकेच्या जोरावर त्याने लातूर आणि परिसरातील इतर श्रीमंत व गरजू विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला. "मुलांना नीट परीक्षेत हमखास यश मिळवून देतो" असे आमिष दाखवून त्याने अनेक पालकांकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर येत आहे.

दिल्ली न्यायालयाने ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावल्यामुळे आता सीबीआय मोटेगावकरची दिल्लीत कसून चौकशी करत आहे. या ९ दिवसांच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.