
अभिनेत्री नेहा धुपियाने 2018 मध्ये अभिनेता अंगद बेदीशी लग्न केलं. लग्नाच्या सहा महिन्यांतच तिने बाळाला जन्म दिला होता. त्यामुळे लग्नाआधीच प्रेग्नंट झाल्यावरून नेहाला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगवर आता नेहाने बेधडक प्रतिक्रिया दिली आहे. लग्नाआधी प्रेग्नंट होणारी मी एकमेव अभिनेत्री नाही, असं तिने थेट म्हटलंय.

'मिड डे'ला दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत नेहा म्हणाली, "मी अंगदशी लग्न केलं आणि लग्नाच्या सहा महिन्यांतच मुलीला जन्म दिला. परंतु आमच्या लग्नाबद्दल सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे मी सहा महिन्यांतच बाळाला कसा जन्म दिला? हे कसं झालं?"

याविषयी नेहा पुढे म्हणाली, "आजसुद्धा मी अशा अनेक अभिनेत्रींबद्दल स्टोरी आणि टॅग पाहते, ज्या लग्नाआधी गरोदर झाल्या आहेत. मला असं वाटतं की मी कमीत कमी नीना गुप्ता आणि आलिया भट्ट यांच्या यादीत मोडते. खरं सांगायचं झालं तर हे खूप हास्यास्पद आहे."

"अशा गोष्टींवर चर्चा करू नये असं मानण्यापेक्षा याला महिलांनी नॉर्मल करण्याची खूप गरज आहे. मला जागरुकता पसरवायचं होतं, जुन्या रुढींना मोडायचं होतं आणि महिलांपर्यंत हा संदेश द्यायचा होता की या प्रवासात त्या एकट्या नाहीत", अशा शब्दांत नेहा व्यक्त झाली.

नेहाने 2018 मध्ये मुलगी मेहरला जन्म दिला. त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. त्याचं नाव त्यांनी गुरिक सिंग धुपिया असं ठेवलंय. अभिनेत्री आलिया भट्टनेही लग्नाच्या सात महिन्यांत मुलीला जन्म दिला होता. तर नीना गुप्ता या माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्सपासून लग्न न करताच प्रेग्नंट होत्या.