
बुलढाणा जिल्ह्यातील साखळी बुद्रुक इथल्या जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणाऱ्या सिद्धी विठ्ठल सोनुने अवघ्या नवव्या वर्षी अभूतपूर्व कामगिरी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील खडतर असा साडेतीनशे फूट खोल असलेला शितकडा धबधब्यावर तिने रॅपलिंग केलं आहे.

चिमुरड्या सिद्धीने या धबधब्यावर रॅपलिंग करून विक्रम केला आहे. तर यापूर्वी तिने 1800 फूट खोल कोकण कड्यावरूनही रॅपलिंग करत विक्रम केला होता. तिच्या या धाडसी कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने देखील घेतली आहे.

तिच्या या धाडसाबद्दल हिमॉर्डिल ट्रेक अॅडव्हेंचर संस्थेनं तिला 'सह्याद्रीची हिरकणी' ही उपाधी बहाल केली आहे. सिद्धीने याआधीही 26 जानेवारी 2025 रोजी हिमालयातील 12,500 फूट उंचीचा केदारकंठा कडा सर केला होता.

केदारकंठा सर करणं भल्याभल्यांना जमत नाही. इतक्या उंचीवर श्वास घेण्यासही अडचण निर्माण होते. तिथेही तिने तिरंगा फडकावला होता. सिद्धीच्या या धाडसी कामगिरी बद्दल तिच्यावर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

रॅपलिंग करताना मला थोडी भीती वाटत होती, परंतु माझ्या वडिलांनी आणि प्रशिक्षकांनी मला प्रोत्साहन दिलं. यापुढे मी अजूनही मोठे कडे सर करायचे स्वप्न पाहतेय, अशी प्रतिक्रिया सिद्धीने यावेळी दिली.