16 वर्षांनंतर नोएल टाटा यांची टाटा इन्व्हेस्टमेंटच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती; आता कोण सांभाळणार धुरा?
Noel Tata Retirement: नोएल टाटा यांनी वयाची 70 वर्षे पूर्ण केल्यामुळे 'टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन'च्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेतली आहे. त्यांच्या जागी कोण नवीन अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारतील हे जाणून घ्या.

वयाची 70 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नोएल टाटा यांनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या अध्यक्ष आणि संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. 11 नोव्हेंबर 2026 रोजी कामकाज संपल्यानंतर त्यांची निवृत्ती लागू झाली असून, त्यांना आता 'चेअरमन एमेरिटस' ही मानद भूमिका देण्यात आली आहे.
नोएल टाटा 2004 मध्ये कंपनीच्या संचालक मंडळात सहभागी झाले होते. 2010 मध्ये त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तब्बल 16 वर्षांहून अधिक काळ त्यांनी कंपनीचे नेतृत्व करत व्यवसायाच्या वाढीत महत्त्वाचे योगदान दिले.
नोएल टाटा यांच्या निवृत्तीनंतर बहराम वकील यांची टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या नव्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 12 नोव्हेंबर 2026 पासून ते पदभार स्वीकारणार असून, कंपनीच्या पुढील वाटचालीची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
कंपनीने अबिजर शब्बीर दीवानजी यांची पाच वर्षांसाठी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. त्यांचा कार्यकाळ 12 नोव्हेंबर 2026 ते 11 नोव्हेंबर 2031 असा असेल. मात्र, या नियुक्तीसाठी भागधारकांची मंजुरी आवश्यक आहे.
टाटा ग्रुपमध्ये चार दशकांहून अधिक अनुभव असलेले नोएल टाटा सध्या टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष असून, ट्रेंट आणि वोल्टासचे अध्यक्ष तसेच टाटा स्टीलचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर टाटा ग्रुपमधील इतर कंपन्यांमध्येही वयाच्या 70 वर्षांच्या नियमानुसार नेतृत्वबदल होण्याची शक्यता चर्चेत आली आहे.