
ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन दुर्घटनेतील मृतांची संख्या 280 च्या पुढे गेली आहे. अपघातानंतर काही छायाचित्रेही समोर आली आहेत, ती पाहून अपघातात किती नुकसान झाले याचा अंदाज येतो.

कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने आणि मालगाडीला धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की, रेल्वेच्या बोगी उलटून एकमेकांवर पडल्या.

ओडिशातील हा अपघात भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघात मानला जात आहे. गाड्या एकमेकांवर कशा आदळल्या हे फोटोत दिसत आहे आणि एनडीआरएफचे जवानही दिसत आहेत.

हे फोटो पाहून कळतं की, येथे एकूण चार रेल्वे ट्रॅक होते. हा अपघात एवढा भीषण होता की मधल्या रुळावरील ट्रेनचा चक्काचूर झाला. ट्रेनचे दरवाजे आणि खिडक्या पूर्णपणे गायब झाल्या आहेत.

एनडीआरएफची टीम मदतकार्यासाठी तैनात आहे. धडक एवढी जबरदस्त होती की ट्रेनची बोगी पुढून पूर्णपणे चेपली गेली.

हा अपघात मानवी चुकीमुळे झाला असावा, असे रेल्वेच्या सिग्नलिंग कंट्रोल रूमच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या वेदनादायक रेल्वे अपघाताच्या काही मिनिटे आधी ट्रेन चुकीच्या ट्रॅकवर होती, असे सांगण्यात आले आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेसचा वेग ताशी 127 किलोमीटर होता. ती मालगाडीला धडकली आणि नंतर रुळावरून घसरली. अपघाताच्या काही मिनिटे अगोदर हावडाकडे जाणारी यशवंतनगर एक्स्प्रेस पलीकडून येत असताना कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकली.