
अतिवृष्टीमुळे संपूर्ण मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ऊस आदी पिकांसह फळबागांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अशावेळी शेतकरी सरकारी मदतीकडे आस लावून बसला आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मराठवाडा दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांनी आज हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी केली.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी फडणवीसांकडे सरकार दरबारी मदतीसाठी पाठपुरावा करण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी अनेक शेतकरी भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.

नांदेड जिल्ह्यातील कुंटुर गावात गोदावरीच्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पूर्णपणे नष्ट झालं आहे. नुसते पीक नाही तर शेतं सुद्धा नव्याने तयार करावी लागणार आहेत. चार ते पाच दिवस हा भाग पाण्याखाली होता, असं गावकऱ्यांनी सांगितल्याचं फडणवीस म्हणाले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत विम्याची रक्कम भरल्यानंतर पावती दिली नाही. आज नुकसान झाल्यावर आम्ही क्लेम कुणाकडे करायचा? अशा शब्दात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्याकडे व्यथा मांडल्याचं फडणवीस म्हणाले.

नांदेड जिल्ह्यात पिंपळगाव (महादेव) इथे सुदर्शन झुंझारे बैलगाडीसह उमा नदीत वाहून गेले. फडणवीस आणि दरेकर यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. या कुटुंबाला शासनाने तत्काळ मदत करावी अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केलीय.

संध्याकाळी बॅटरीच्या उजेडातही फडणवीस आणि दरेकर यांनी पाहणी दौरा केला. नांदेड जिल्ह्यातील शेलगाव, अर्धापूरमध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी त्यांनी केलीय. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकाची भेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवली.