
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातत पोहोचल्यानंतर त्यांनी स्मृती मंदिरात संघाचे संस्थापक डॉ. केबी हेडगेवार यांना आदरांजली वाहिली. यावेळी RSS प्रमुख मोहन भागवतदेखील मोदींसोबत होते. हेडगेवार यांच्यासोबतच मोदींनी माधव सदाशिव गोळवलकर यांनाही आदरांजली वाहिली.

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात पोहोचले आहेत. याआधी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे शताब्दी वर्ष आहे.

आरएसएसच्या स्मृती मंदिरात काही वेळ घालवल्यानंतर पंतप्रधानांचा ताफा दीक्षाभूमीकडे रवाना झाला. मोदी दीक्षाभूमीवर पंधरा मिनिटं थांबले. याठिकाणी 1956 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. मोदींच्या दौऱ्यानिमित्त ट्रस्टकडून संपूर्ण तयारी करण्यात आली.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते माधव नेत्रालयाचं भूमिपूजन पार पडलं. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत, स्वामी अवधेशानंद गिरी, गोविंद गिरी महाराज, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीदेखील उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली. त्यांनी देशवासियांना चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. "भगवान झुलेलालजी आणि गुरू अंगद देवजी यांची आज जयंती आहे. यावर्षी आरएसएसच्या गौरवशाली प्रवासाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. स्मृती मंदिराला भेट देऊन मला हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजींना आदरांजली वाहण्याची संधी मिळाली. मी दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. हे माझं सौभाग्य आहे", असं मोदी म्हणाले.