
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. आज ते नागपुरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयाला भेट देऊन स्मृती मंदिरात संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना आदरांजली वाहिली.

या वेळी पंतप्रधान मोदींसोबत सरसंघचालक मोहन भागवत हे देखील उपस्थित होते. केशव हेडगेवार यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माधव सदाशिव गोळवलकर यांनाही श्रद्धांजली अर्पण केली.

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पहिल्यांदाच RSS च्या मुख्यालयात आले आहेत. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना संघ मुख्यालयात येऊन गेले आहेत.

नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या उपस्थितीत केली जाणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन केले जाणार आहे.

यामध्ये अनमॅन्ड एरियल व्हेईकल्ससाठी १२५० मीटर लांबीची विशेष धावपट्टी आणि लोइटरिंग म्युनिशन चाचणीसाठी अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी हे एकाच मंचावर असणार आहेत. यापूर्वी ते दोघे अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात एकत्र होते.