
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसला भेट दिली. यावेळी एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांना काही माहिती दिली. त्याचसोबत त्यांनी जवानांशी संवादसुद्धा साधला.

भारतातील सर्वांत मोठ्या लष्करी हवाई तळांपैकी आदमपूर एअरबेस हे दुसरं सर्वांत मोठं एअरबेस आहे. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात आदमपूर एअरबेसने खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती.

भारत-पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या संघर्षादरम्यान पाकिस्तानकडून आदमपूर एअरबेसचं मोठं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता. पंजाबमधील आदमपूर एअरबेसचं सर्वांत मोठं नुकसान झाल्याचं पाकिस्तानी लष्कराचे मुख्य प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितलं होतं.

परंतु भारताचे एअर मार्शल ए. के. भारती यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की आपले सर्व लष्करी तळ आणि आपली यंत्रणा पूर्णपणे कार्यरत आहेत. यावरून कोणत्याही एअरबेसला कोणतंही मोठं नुकसान झालं नाही, हे स्पष्ट झालं.

ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पहिल्यांदा देशाला संबोधित केलं. यापुढे कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर त्याला आमच्या पद्धतीने चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, कुणीही अण्वस्त्रांची धमकी दिली, तरी त्याला भीक न घालता निर्णायक प्रहार केला जाईल, अशा स्पष्ट शब्दांत मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला.