
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. राजपक्षांच्या सभा अन् रॅलीने निवडणुकीचा 'माहौल' तयार झाला आहे. अशातच विविध पक्षांचे उमेदवार आपले निवडणूक अर्ज दाखल करत आहेत. साताऱ्यात देखील उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची लगबग पाहायला मिळते आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आपला अर्ज दाखल करण्याआधी उदयनराजे साताऱ्यात शक्तीप्रदर्शन करत आहेत. यावेळी महायुतीतील नेतेही त्यांच्यासोबत आहेत.

उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. मात्र आज शिवेंद्रराजे आणि उदयनराजे एकाच मंचावर पाहायला मिळत आहेत. उदयनराजे यांच्या रॅलीत शिवेंद्रराजे भोसले सहभागी झाले आहेत.

खासदार उदयनराजे भोसले हे जलमंदिर निवासस्थानातून बैलगाडीमध्ये उभं राहून गांधी मैदानाच्या दिशेने झाले.खासदार उदयनराजे भोसले यांचा महायुतीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गांधी मैदानातून शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली.

उदयनराजे भोसले यांनी एबी फॉर्म भरण्याची प्रक्रिया गाडीत बसूनच पूर्ण केली आहे. साताऱ्यातील गांधी मैदानातील सजवलेल्या रथातून शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. उदयनराजे भोसले यांच्यासोबत शिवेंद्रराजे भोसले, महेश शिंदे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अतुल भोसले उपस्थित आहेत.