
विमान प्रवासादरम्यान मोबाईल फोन किंवा लॅपटॉप चार्ज करण्यासाठी पॉवर बँक वापरण्याची अनेकांना सवय असते. ही सवय असलेल्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जगातील प्रमुख विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या एमिरेट्स एअरलाइन्सने विमानात पॉवर बँक वापरण्यावर बंदी घातली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. काल २ ऑक्टोबरपासून या नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. एमिरेट्सच्या नवीन नियमांनुसार, प्रवाशांना विमानात बसल्यानंतर पॉवर बँकांचा वापर पूर्णपणे बंद असेल.

प्रवाशांना केवळ १०० वॅट-तास (Wh) क्षमतेपर्यंतची पॉवर बँक त्यांच्या केबिन बॅगेत ठेवण्याची परवानगी असेल. या संपूर्ण प्रवासादरम्यान पॉवर बँक बंद ठेवावी लागेल आणि ती वापरता येणार नाही.

प्रवासादरम्यान पॉवर बँकने फोन किंवा लॅपटॉप चार्ज करण्यास मनाई असेल. सीटवरील सॉकेटद्वारे पॉवर बँक चार्ज करण्यासही मनाई असेल.

एमिरेट्सने पॉवर बँक साठवण्याबाबतही स्पष्ट नियम केले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने १०० Wh पर्यंतच्या पॉवर बँक प्रवाशी त्यांच्या खिशात किंवा हँड लगेजमध्ये ठेवून शकते. पण त्या ओव्हरहेड बिनमध्ये ठेवण्यास सक्त मनाई आहे.

या निर्णयामागे प्रवाशांची सुरक्षा हे प्रमुख कारण असल्याचे एमिरेट्सने स्पष्ट केले आहे. पॉवर बँकांमध्ये लिथियम-आयन (Lithium-ion) किंवा लिथियम-पॉलिमर बॅटरी (Lithium-polymer Battery) वापरल्या जातात. या बॅटरी जास्त गरम झाल्यास 'थर्मल रनअवे' (Thermal Runaway) प्रक्रियेमुळे आग पकडू शकतात किंवा स्फोट होण्याची शक्यता असते.

विमान कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, पॉवर बँकांवरील वाढत्या वापरामुळे विमान वाहतूक उद्योगात लिथियम-आयन बॅटरीशी संबंधित अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे उड्डाणादरम्यान त्यांचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

त्यामुळे प्रवाशांनी विमानात चढण्यापूर्वीच त्यांचे सर्व डिव्हाइस चार्ज करून घेण्याचे आवाहन केले आहे, कारण विमानात चार्जिंग पोर्ट उपलब्ध आहेत. याशिवाय, FAA, TSA, CAA आणि IATA सारख्या जागतिक विमान वाहतूक प्राधिकरणांनीही विमानांमध्ये पॉवर बँक वापरण्याबाबत नियम स्थापित केले आहेत, ज्यानुसार पॉवर बँक फक्त केबिन बॅगमध्ये नेता येते आणि ती ठराविक क्षमतेची असावी लागते.