Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा शॉर्ट हेअर लूक, ‘डिंक्स’साठी कापले केस; या ट्रेंडिंग शब्दाचा अर्थ तरी काय?
Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी एक नव्या हटके अंदाजाच प्रेक्षकांसमोर आली आहे. नव्या 'डिंक्स' या चित्रपटासाठी तिने केस कापले आहेत. नावाप्रमाणेच चित्रपटाचा विषयसुद्धा अनोखा आहे. डिंक्स म्हणजे काय, ते समजून घ्या..

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या नव्या हेअरकटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. हा हेअरकट तिने तिच्या नव्या चित्रपटासाठी केला आहे. 'डिंक्स' असं या चित्रपटाचं नाव आहे. मात्र याचा नेमका अर्थ तरी काय आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

बदलत्या काळासोबत नात्यांकडे पाहाण्याचा दृष्टिकोनही बदलत आहे. लग्न, करिअर आणि बदलत्या नात्यांच्या विश्वात डोकावणाऱ्या ‘डिंक्स’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. अजय मोंगा यांच्या दिग्दर्शनाखाली साकारला जाणारा हा चित्रपट आजच्या पिढीच्या आयुष्याशी आणि त्यांच्या भावनिक गुंतागुंतीशी जोडलेला असल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे, या चित्रपटात प्राजक्ता माळी एका नव्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे.

चित्रपटाच्या मुहूर्ताच्या निमित्ताने समोर आलेल्या प्राजक्ताच्या लूकने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्राजक्ताच्या या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘डिंक्स’ अर्थात डबल इनकम नो किड्स ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवत आजच्या तरुण जोडप्यांच्या निवडी, नातेसंबंध, अपेक्षा आणि त्यातून निर्माण होणारे भावनिक प्रश्न या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. डिंक्स म्हणजे दोघंही कमावणारं जोडपं असतं पण त्यांना मुलं नसतात.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अजय मोंगा म्हणतात, “‘डिंक्स’ हा विषय म्हणजे आजच्या काळाची नात्यांकडे पाहाण्याची बदलती दृष्टी आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून प्राजक्ताचा लूक आजच्या काळाशी जोडलेला आहे. या लूकमुळे तिच्या व्यक्तिरेखेचा अंदाज येतो. प्राजक्तासोबत काम करण्याचा अनुभव खूप खास आहे आणि तिच्या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांना नक्कीच एक वेगळी बाजू पाहायला मिळेल.”

‘डिंक्स’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याने आता या चित्रपटाची कथा नेमकी कोणत्या वळणावर जाते, प्राजक्ताची व्यक्तिरेखा काय असेल? तिच्यासोबत अजून कोण कलाकार पाहायला मिळतील आणि ‘डिंक्स’ या संकल्पनेमागचं भावविश्व चित्रपटातून कसं उलगडणार, याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.