
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे 31 ऑगस्ट रोजी निधन झाले. तिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. प्रिया गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होती. तिचा हा लढा अपयशी ठरला. तिच्यानिधनाने पती शंतनु मोघेला मोठा धक्का बसला. आता प्रियाच्या निधनाच्या जवळपास 15 दिवसांनी शंतनुने स्वत:ला सावरले आहे.

प्रियाच्या निधनाच्या काही दिवस आधीच शंतनुने नव्या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र, प्रियाच्या अचानक जाण्याने त्याला हे काम थांबवावे लागले.

प्रियाच्या निधनाच्या आधी शंतनु मोघेने स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. या मालिकेत तो मंजिरीच्या भावाची भूमिका साकारत आहे.

या मालिकेचा पहिलाच एपिसोड टेलिकास्ट झाला आणि दुसऱ्याच दिवशी प्रियाचे निधन झाले. प्रियाने या मालिकेचा पहिला एपिसोड देखील पाहिला होता.

रात्री प्रियाने 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेचा पहिला एपिसोड पाहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे निधन झाले अशी माहिती तिचा भाऊ, अभिनेता सुबोध भावेने एका मुलाखतीत दिली होती.

आता याच मालिकेत शंतनु पुन्हा काम करताना दिसत आहे. प्रियाच्या जाण्याने त्याच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. मात्र त्याने आता स्वत:ला सावरले आहे.