
सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याचा सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लाखो रुपये खर्च करूनही या रंगमंदिराची स्थिती दिवसेंदिवस खालावत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी सकाळी बालगंधर्व कला दालनातील छताचा काही भाग कोसळल्याने ही बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे १० वाजता कला दालनाचे पीओपीचे फॉल सिलिंग अचानक खाली पडले. सुदैवाने, या वेळेस दालनात कोणीही उपस्थित नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र, या घटनेमुळे रंगमंदिराच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर, पतित पावन संघटनेने या गंभीर प्रकारासाठी जबाबदार असलेल्या ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी कला दालनाची पाहणी केली.

आता या प्रकरणी महापालिका काय पावलं उचलते आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती उपाययोजना करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. बालगंधर्व रंगमंदिराचे महत्त्व लक्षात घेता, या वास्तूच्या सुरक्षिततेची आणि देखभालीची जबाबदारी अधिक गांभीर्याने घेतली जाणे आवश्यक आहे.