विमानं चुकली, रुग्ण ताटकळले अन्… मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर सध्याची स्थिती काय? फोटो समोर
पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी झाल्याने गेल्या १६ तासांपासून महाभयंकर वाहतूक कोंडी झाली आहे. २० किमीच्या रांगा, रुग्णांचे हाल आणि प्रवाशांचा संताप; वाचा या घटनेचा सविस्तर आढावा.

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर आडोशी बोगद्याजवळ भीषण टँकर अपघात झाला. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस-वे आणि जुना पुणे-मुंबई महामार्ग अशा दोन्ही मार्गांवर २० ते २२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर प्रोपोलिन गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे रोखून ठेवली आहे.

या दुर्घटनेला तब्बल १६ तास उलटले आहेत. मात्र अद्याप परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही. यामुळे प्रवाशांचा संयम आता सुटत चालला आहे.

काल रात्रीच्या सुमारास हा टँकर पलटी झाला. टँकरमधून प्रोपोलिन गॅसची गळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने गळती थांबवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र धोका टळेपर्यंत महामार्ग उघडणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे.

मध्यरात्रीनंतर टँकर क्रेनच्या साहाय्याने तिसऱ्या लेनवर ओढण्यात आला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक एका मार्गिकेवरून (लेन) सुरू करण्यात आली. मात्र, वाहनांचा ओघ प्रचंड असल्याने सध्या गाड्यांचा वेग अतिशय कमी आहे.

या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका पहाटेच्या सुमारास प्रवास करणाऱ्यांना बसला आहे. मुंबई विमानतळावर जाण्यासाठी निघालेल्या शेकडो प्रवाशांची विमानं चुकली आहेत, ज्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

तसेच या वाहतूक कोंडीत काही कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि इतर गंभीर आजारी रुग्ण अडकल्याची माहिती समोर आली आहे. अनेक रुग्णवाहिकांनाही वाट मिळणे कठीण झाले आहे.

तसेच लहान मुले, वृद्ध आणि महिला प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. महामार्गावर जवळपास कोणतीही सुविधा नसल्याने प्रवाशांना उपाशीपोटी तासनतास गाडीतच बसून राहावे लागत आहे.

प्रशासनाकडून सध्या ब्लॉक पद्धतीने वाहतूक सोडली जात आहे. पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ थांबवून मुंबईच्या दिशेने अडकलेली वाहने पुढे सोडली जात आहे. मात्र, एवढा मोठा अपघात आणि त्यानंतर झालेली कोंडी हाताळण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका होत आहे.

आम्ही महामार्गावर भरमसाठ टोल भरतो, पण अशा संकटाच्या वेळी आम्हाला किमान माहिती किंवा मदत का मिळत नाही? असा संतप्त सवाल वाहनचालकांकडून केला जात आहे.