
झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत बनीचं बोर्डिंग स्कूलमध्ये अॅडमिशन होतं आणि परतीच्या प्रवासाला निघालेल्या वसुंधराचा होस्टेलमधून पाय निघत नाही. बनीच्या मनाची देखील घालमेल होतेय, पण तो वसुंधरासमोर रडू शकत नाहीये.

वसुंधरा तिथून गेल्यानंतर बनी ढसाढसा रडायला लागतो. तर इथे जयश्री पाय दुखण्याचं खोटं नाटक करतेय. वॉर्डन बनीची सगळ्यांसोबत ओळख करून देते आणि पूर्ण दिवसाचं रुटीन समजावते.

हॉस्टेलमध्ये दोन विद्यार्थी मोहित आणि प्रणित बनीला घाबरवण्याचा प्रयत्न करतात आणि हे सगळं बनीसाठी नवीन असल्यामुळे बनीला वसुंधराची खूप आठवण येते.

वसुंधरा भुकेली असल्याकारणाने आकाश तिला बाहेर जेवायला घेऊन जातो. तिकडे आकाशची भेट लकीशी होते. आकाशने बिझनेस वाढवावा म्हणून सगळंकाही गहाण ठेवून लोन घेतलंय. भास्कर या विचाराच्या विरोधात आहे. यावरून घरामध्ये पहिल्यांदा भास्कर आणि आकाशमध्ये भांडण होतं.

वसु आणि अवनी भावांच्या भांडणात पडायचं नाही असं ठरवतात. इथे बनीने केलेला फोन वसुंधरा उचलते मात्र तिला बनी सोबत बोलता येत नाही. त्यामुळे बनीचा गैरसमज होतो की वसुंधरा त्याच्याशिवाय ठाकूरांच्या घरी खुश आहे.