
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीसह हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरलाय. इतकंच नाही तर त्यांनी मशिदींवरील भोंग्यांना तीव्र विरोध करत भोंगे हटवण्याबाबत राज्य सरकारला अल्टिमेटमही दिलाय. तसंच भोंगे हटवले नाही तर त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचे आदेशच राज यांनी मनसैनिकांना दिलेत.

राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज यांनी हनुमान चालीसाचा मुद्दा उचलल्यानंतर सर्वज राजकीय पक्षांकडून आज हनुमान जयंती निमित्त महाआरती आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आलंय.

राज यांच्या उपस्थितीत मनसेनंही पुण्यात हनुमान मंदिरात महाआरती केली. त्यावेळी राज यांचा उल्लेख हिंदू जननायक असा करण्यात आला. महाआरतीवेळी पाहायला मिळालेलं राज ठाकरे यांचं रुप त्यांची आगामी राजकीय वाटचाल स्पष्ट करणारं होतं.

राज यांच्या खांद्यावर भगवी शाल देण्यात आली. मनसैनिकांकडून देण्यात आलेली गदा राज यांनी उचलून धरली. तसंच आरतीचं ताट हातात घेत राज यांनी हनुमानाची आरतीही केली.

राज ठाकरे यांचं हे रुप मनसे आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनच राज्यात राजकारण करणार हे स्पष्ट करणारं आहे. इतकंच नाही तर राज ठाकरे यांचं हे भगवं रुप शिवसेनेच्या मनात धडकी भरवणारं ठरेल, अशीही चर्चा आता राजकारणात सुरु झालीय.
