
बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक स्टारकिड्सनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, त्यापैकी काहींवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केले, तर काहींना पूर्णपणे नाकारले. खुशी कपूर, जुनैद खान, इब्राहिम अली खान यांच्यासह अनेक स्टारकिड्सनी गेल्या काही वर्षांत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. बहुतेक स्टारकिड्स आपल्या पालकांसारखेच स्टार होऊन चमकण्याचे स्वप्न पाहतात, पण बॉलिवूडमध्ये अशी एक नायिकाही झाली जिला सुपरस्टारची मुलगी असूनही चित्रपटांमध्ये रस नव्हता. आम्ही जिच्याविषयी बोलत आहोत ती आहे ट्विंकल खन्ना. तिने स्वतः याबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

ट्विंकल खन्नाने १९९५ मध्ये 'बरसात' या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात ती बॉबी देओलसोबत दिसली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि प्रेक्षकांना खूप आवडला. मात्र, ट्विंकलच्या नंतरच्या चित्रपटांनी फारशी कमाई केली नाही. २००१ मध्ये आलेल्या 'लव के लिए कुछ भी करेगा' या चित्रपटानंतर तिने अंतर ठेवण्यास सुरुवात केली. ट्विंकल सध्या 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल'मुळे चर्चेत आहे. हा एक चॅट शो आहे. या शोमध्ये ती काजोलसोबत दिसत आहेत.

ट्विंकल खन्नाने ट्वीक इंडियासाठी करीना कपूरशी बोलताना उघड केले की तिला अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. दबावाखाली येऊन तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'मला खरंच कधीच अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. ती माझी मजबुरी होती, कारण माझी आई एकटी होती आणि तिने एकट्याने सर्वांचा खर्च उचलला होता' असे ट्विंकल म्हणाली.

पुढे ती म्हणाली, 'मी अभिनेत्री होण्याबद्दल कधी विचार केला नव्हता. मला तर अकाउंटंट व्हायचे होते. मी लहानपणापासूनच अभिनेत्यांमध्ये वाढले, पण प्रसिद्धीची कधीच भूक नव्हती. मला प्रसिद्धीकडे जायचे नव्हते, प्रसिद्धी माझ्याकडे स्वतः आली.'

ट्विंकल खन्नाने कबूल केले की तिला वडील राजेश खन्ना आणि आई डिंपल कपाडिया यांच्या स्टारडमने तिच्या कारकिर्दीत खूप मदत केली. 'माझ्यासोबत ड्रामा करण्यापूर्वी लोक दोनदा विचार करत. मला पहिला ब्रेक सहज मिळाला, पण त्यानंतर स्वतःच्या कारकिर्दीवर काम करावे लागते' असे ट्विंकल म्हणाली.