
अभिनेत्री रति अग्निहोत्रीने 1985 मध्ये अनिल विरवानी यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 30 वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. 2015-16 दरम्यान रति आणि अनिल यांच्या वैवाहिक आयुष्यात बऱ्याच समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याचवेळी दोघांच्या घटस्फोटाचीही चर्चा होती. आता त्यांचा मुलगा तनुज विरवानीने आईवडिलांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

'एनडीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुजने सांगितलं, "मला समजत नाही की लोक असं का म्हणतात की माझे पालक विभक्त झाले आहेत. त्यांचा घटस्फोट झाला आहे. मी सरळ भाषेत तुम्हाला सांगतो की माझे आईवडील विभक्त झाले नाहीत. 2015 मध्ये काही गोष्टी ठीक नव्हत्या, तेव्हा दोघं काही काळ वेगळे राहिले होते. नंतर ते पुन्हा एकत्र आले."

"आम्ही अजूनही एकाच घरात राहतो, एकत्र फिरायला जातो, सोबत जेवतो. वैवाहिक आयुष्यात थोड्याफार समस्या असतातच. माझ्या आईवडिलांच्या नात्यातही असाच एक काळ होता. पण आता दोघंही ठीक आहेत", असं त्याने स्पष्ट केलं.

"मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. माझ्या आईवडिलांच्या नात्यात सर्वकाही ठीक आहे का पाहणं ही माझी जबाबदारी आहे. सर्वजण एकत्र राहू शकतील, यासाठी मी प्रयत्न करतो. माझ्या प्रयत्नांमुळे ते दोघं आज सोबत आहेत. हेच माझं यश आहे", असंही तो पुढे म्हणाला.

2015 मध्ये रतिने तिच्या पतीवर बरेच आरोप केले होते. इतकंच नव्हे तर तिने मुंबई पोलिसांकडे पतीविरोधात एफआयआरसुद्धा दाखल केलं होतं. रतीने पती अनिलवर कौटुंबिक हिंचाचाराचा आरोप केला होता.