
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचा नवीन चित्रपट 'आशा' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला महाराष्ट्रातून प्रचंड प्रेम आणि पाठिंबा मिळत असून, थिएटर्समध्ये हाऊसफुल्ल शो सुरू आहेत. रिंकूने यात आशा सेविकेची मुख्य भूमिका साकारली आहे, ज्यामुळे तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. ती स्वतःही आपल्या कामगिरीमुळे समाधानी आणि आनंदी दिसते. एक बाजूला 'आशा'सारख्या गंभीर आणि सामाजिक विषयावर आधारित चित्रपटात ती दिसते, तर दुसरीकडे लावणी नृत्य करतानाही तिने चाहत्यांना प्रभावित केले आहे. तिच्या लावणीच्या परफॉर्मन्सचेही सोशल मीडियावर खूप कौतुक झाले.

सध्या रिंकू राजगुरूच्या नावाची सर्वत्र चर्चा आहे. 'सैराट'मधील तिची बालिश आणि बंडखोर इमेज, आता परिपक्व अभिनेत्री म्हणून तिच्यातील बदल चाहते लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतींमध्ये तिने आपले विचार, नातेसंबंधांबद्दलची मते मोकळेपणे व्यक्त केली आहेत.

चाहत्यांकडून तिला नेहमी रिलेशनशिप आणि लग्नाबाबत प्रश्न विचारले जाते. रिंकूने स्पष्ट केले आहे की, सध्याच्या जेन झेडच्या रिलेशनशिपच्या संकल्पनेवर तिचा विश्वास नाही आणि ती तिला पटत नाही. एका मुलाखतीत ती पहिल्यांदाच आपल्या वैयक्तिक नात्याबाबत बोलताना म्हणाली की, तिचे एक नाते आहे जे तिच्या कुटुंबाला मान्य नाही आणि ते त्याबाबत आनंदी नाहीत.

रिंकू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सिनेमाच्या प्रमोशनसाठी फोटो-व्हिडीओ शेअर करते, तसेच इन्स्टाग्राम स्टोरीजवर व्हायरल कोट्स किंवा मजेदार पोस्ट्स टाकते. अलीकडे तिने एक मजेदार व्हायरल पोस्ट शेअर केली, ज्यात लिहिले होते की "मला माझी झोप खूप आवडते आणि माझ्या झोपेलाही मी आवडते. पण माझ्या कुटुंबाला हे नातं आवडत नाही." यातून तिने हलक्या-फुलक्या पद्धतीने सांगितले की, तिच्या कुटुंबाला न आवडणारे ते 'नाते' खरेतर तिच्या झोपेशी आहे!

'आशा' चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, 'सैराट'नंतर रिंकूची इमेज बदलण्यात हा चित्रपट महत्त्वाचा ठरेल अशी अपेक्षा आहे. यानंतर ती 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे, जो लवकरच रिलीज होईल.