
'बिग बॉस मराठी 5'चा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच गेल्या दोन आठवड्यांपासून सूत्रसंचालक रितेश देशमुख या शोमध्ये दिसत नाहीये. निलेश साबळे गेल्या दोन आठवड्यांपासून कार्यक्रमाची धुरा सांभाळतोय.

रितेश देशमुख मध्येच शो सोडून कुठे गेला, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता. त्याचं उत्तर अखेर मिळालं आहे. रितेश त्याची पत्नी जिनिलिया आणि मुलांसोबत चॅम्पियन्स लीगची मॅच पाहायला परदेशात गेला आहे.

रितेश-जिनिलियाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फुटबॉल चॅम्पियन लीगमधील सामना पाहतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. लंडनमधील एमिरेट्स स्टेडियमवर हा सामना पार पडला होता. मात्र या फोटोंवर बिग बॉसच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'अरे हा तर बिग बॉस सोडून इथे फिरतोय', असं एकाने लिहिलंय. तर 'आधी बिग बॉसचा कार्यक्रम पूर्ण करा नीट' असं दुसऱ्याने म्हटलंय. 'दादा आणि वहिनी, आता जेव्हा तुमचा चित्रपट प्रदर्शित होईल, तेव्हा आम्ही सगळे पळून जाणार', अशाही शब्दांत नेटकऱ्याने नाराजी व्यक्त केली.

रितेशने ग्रँड फिनालेपूर्वीच बिग बॉस हा शो सोडला की काय, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात होता. मात्र अशा पद्धतीने शो मध्येच सोडून परदेशात जाणं बिग बॉसच्या चाहत्यांना रुचलं नाही. म्हणून त्यांनी या फोटोंवर कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली.