भोंदू अशोक खरातवरचा सिनेमा अडचणीत! थेट रुपाली चाकणकरांनी उचलले मोठे पाऊल
Rupali Chakankar: महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता यावर महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने खळबळ माजली होती. महिलांचे लैंगिक शोषण करुन त्यांच्यावर बलात्कार करणारा हा भोंदूबाबा सध्या तुरुंगात आहे. त्याने अनेक महिलांना फसवले, काही शेतकऱ्यांना लुबाडले. अशोक खरातचे राजकीय कनेक्शन देखील समोर आले. त्याचे महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे देखील म्हटले जात आहे. आता खरातवर सिनेमा येत असल्याचे कळताच रुपाली चाकणकर यांनी मोठे पाऊल उचलले आहे.

अशोक खरातचा जीवनप्रवास दाखवण्यासाठी एक सिनेमा येत आहे. या सिनेमाचे नाव महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स असे आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अशोक खरातच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री दिपाली सय्यद रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार आहे. हे पाहून रुपाली चाकणकर यांनी मोठे पाऊस उचलले आहे.

रुपाली चाकणकर यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स सिनेमाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी या सिनेमाविरोधात कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

"जो कथित सिनेमा येतो आहे ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. एखादे पात्र साकारताना सबंधित पात्राची परवानगी घेणे आवश्यक असते माझी कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यांच्याविरोधातही मी कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलणार आहे" असे रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स या चित्रपटात मुख्य भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026ला प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.