
अभिनेत्री सागरिका घाटगे आणि तिचा पती झहीर खान यांनी गणेश चतुर्थीनिमित्त त्यांच्या चिमुकल्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याचा चेहरा दाखवला. झहीर आणि सागरिका लग्नाच्या आठ वर्षांनंतर आई-बाबा झाले आहेत.

झहीर आणि सागरिका यांनी त्यांच्या मुलाचं नाव फतेहसिंह खान असं ठेवलंय. आतापर्यंत त्यांनी फोटोंमध्ये मुलाचा चेहरा दाखवला नव्हता. आता पहिल्यांदाच त्यांनी मुलाचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे.

यावर्षी एप्रिल महिन्यात फतेहसिंहचा जन्म झाला. गणेश चतुर्थीदिनी गणपती बाप्पाची पूजा करतानाचे फोटो सागरिकाने पोस्ट केले आहेत. यामध्ये आई-वडिलांसोबत चिमुकला फतेहसिंहसुद्धा पारंपरिक पोशाखात दिसला.

या फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष कुटुंब आहे हा, देव तुम्हाला आशीर्वाद देवो. भारतात अशा आणखी लोकांची गरज आहे', असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

झहीर आणि सागरिका यांनी नोव्हेंबर 2017 मध्ये लग्न केलं. त्याआधी 2016 मध्ये क्रिकेटर युवराज सिंगच्या लग्नात त्यांनी रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. या दोघांचं आंतरधर्मीय लग्न असल्याने अनेकांचं लक्ष या जोडीकडे वेधलं गेलं होतं.